फलटण चौफेर, दि. १६ मार्च २०२६: फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत अखेर राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून भाजपच्या शिवांजली भोसले यांची सभापतीपदी तर शिवसेना राजे गटाचे अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
फलटण पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत भाजपला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ तर शिवसेनेला ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापतीपद कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. यात आज अचानक शिवांजली भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना सभापती पदाची संधी देण्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे
सभापतीपदासाठी विविध स्तरावर राजकीय चर्चांना वेग आला असताना अखेर भाजपने राजकीय रणनीती आखत सभापतीपदावर आपली बाजी मारली. त्यानुसार भाजपने शिवांजली भोसले यांची सभापतीपदी निवड निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे उपसभापतीपदी शिवसेना राजे गटाचे अमोल सस्ते यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान स्थानिक राजकीय घडामोडींना वेग आला होता. विविध गटांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच अखेर सर्वानुमते निवड निश्चित करण्यात आली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.
या निवडीनंतर पंचायत समितीच्या आगामी कामकाजाबाबत अपेक्षा व्यक्त होत असून तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचे आव्हान नव्या पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. राजकीय घडामोडींमध्ये भाजपने प्रभावी भूमिका बजावत सभापतीपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतल्याची चर्चा फलटण तालुक्यात सुरू आहे.

COMMENTS