Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भरदिवसा बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास – जिंतीतील माडकर वस्तीवरील घटना

 



फलटण चौफेर दि १ जुलै २०२५

 फलटण तालुक्यातील जिंती गावाच्या माडकर वस्ती येथे आज दुपारी भरदिवसा अज्ञात चोरट्याने बंद घराचे दार उघडून आत प्रवेश करत तब्बल ७ ते ८ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ जुलै रोजी दुपारी  १ ते १.३० च्या सुमारास माडकर वस्ती येथे राहणारे लक्ष्मण मारुती नरुटे (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. यावेळी लक्ष्मण नरुटे हे शेतामध्ये गेले होते, तर त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका असल्याने त्या कामानिमित्त अंगणवाडीत गेल्या होत्या. घरात कुणी नसल्याची खात्री करून चोरट्याने घराचे दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला.



कपाटात ठेवलेले ७ ते ८ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा  ऐवज लंपास करण्यात आला. चोरीची माहिती लक्षात येताच नवले कुटुंबियांनी तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने फलटण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.



या घटनेमुळे माडकर वस्ती आणि परिसरात खळबळ उडाली असून दिवसाढवळ्या अशा प्रकारे बंद घर फोडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परिसरात लवकरच गस्त वाढवण्यात यावी व चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस  करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.