विडणी (योगेश निकाळजे) विडणी ता फलटण येथील कोकरेवाडी परिसरात आज (शुक्रवार) सकाळी जंगली रानगव्याने धुमाकूळ घालत एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव (रा. कोकरेवाडी, विडणी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास रानगवा अचानक वस्तीच्या दिशेने आला. परिसरात फिरत असताना त्याने राजेंद्र जाधव यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या संबंधित रानगवा विडणी परिसरातच फिरत असल्याची माहिती मिळत असून त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग यांच्या सातारा, पुणे व बारामती येथील पथकांना पाचारण करण्यात आले आहे रानगव्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे व कोणतीही हालचाल दिसल्यास तत्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS