फलटण चौफेर दि ६ जानेवारी २०२६
अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करून करण्यात आलेल्या खुनाचा प्रकार फलटण तालुक्यात उघडकीस आला असून, फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या चार तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सस्तेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीनजीक फलटण रस्त्यावर गणेश बाळु मदने (वय ४०, रा. सस्तेवाडी) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथून पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र तपासादरम्यान घटनास्थळी रक्ताचे थारोळे आढळून आले. तसेच मृताची मोटारसायकल साईड स्टॅण्डवर सुस्थितीत उभी असून तिची चावी स्विचलाच असल्याचे निदर्शनास आले. या बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपास अधिक सखोल केला.
मृताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, काही वेळापूर्वी शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांशी गणेश मदने यांचे भांडण झाल्याची माहिती समोर आली. घटना मध्यरात्री निर्जनस्थळी घडल्याने तांत्रिक तपासास मर्यादा होत्या. तरीही गोपनीय बातमीदार, परिस्थितीजन्य पुरावे आणि पोलिसी अनुभवाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
या तपासातून रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) आणि गणेश शंकर जाधव (वय २२, मूळ रा. कलिना, मुंबई; सध्या रा. फलटण) हे दोन संशयित निष्पन्न झाले. हे दोन्ही संशयित परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
या घटनेप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक, शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती ज्योती चव्हाण, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, महादेव पिसे, कल्पेश काशिद, अमोल देशमुख व तुषार नलवडे व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


COMMENTS