फलटण चौफेर दि ११ जुलै २०२५ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बनावट तणनाशके तयार करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत १२ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
करंजे नाका (सातारा) येथे काही व्यक्ती बनावट शेती औषधे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ व डीबी पथकाने ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता करंजे नाका येथे सापळा रचून कारवाई केली. टेम्पो (क्र. एम.एच.११ बी.एल.०१७३) ला अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये बायर कंपनीच्या ‘राउन्डअप’ या नावाखाली बनावट तणनाशकांची २६० बाटल्यांचा साठा आढळून आला.
सदर औषधांची तपासणी टू बडी कन्सल्टिंग प्रा. लि. चे असिस्टंट मॅनेजर सतीश पिसाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली असता, ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर टेम्पो व सुमारे २,०६,७००/- रुपये किंमतीचे औषध ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान शाहूपुरी, रेवडी (ता. कोरेगाव), फलटण, व वडूज (ता. खटाव) येथील ठिकाणी छापे टाकून एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण १२,५९,३७०/- रुपयांचा बनावट तणनाशक साठा, दोन चारचाकी वाहने आणि टेम्पो जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयतांमध्ये धैयशिल अनिल घाडगे (३१) – रा. समता कॉलनी, शाहूपुरी, सातारा, युवराज लक्ष्मण मोरे (२८) – रा. रेवडी, ता. कोरेगाव,गणेश मधुकर कोलवडकर (३०) – रा. धालवडी, ता. फलटण, निलेश भगवान खरात (३८) – रा. जाधववाडी, ता. फलटण, तेजस बाळासो ठोंबरे (३०) – रा. वडूज, ता. खटाव ,संतोष जालिंदर माने (४५) – रा. नडवळ, ता. खटाव यांचा समावेश आहेही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांच्या पथकाने केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ करत आहेत.