फलटण चौफेर दि २ सप्टेंबर २०२६
फलटण तालुक्यात महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह निंभोरे गावच्या हद्दीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनिकेत राजेंद्र भोसले (वय २४, रा. मलठण, ता. फलटण) असे मृत तरुणाचे नाव आहे. निंभोरे गावच्या हद्दीतील एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
अनिकेत भोसले हा २८ जुलै २०२६ रोजी नेहमीप्रमाणे कमिन्स कंपनीत कामासाठी गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र तो आढळून न आल्याने त्याची आई स्वाती राजेंद्र भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मिसिंग नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस आणि नातेवाईकांकडून अनिकेतचा शोध सुरू होता.
आज बुधवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी 11वाजण्याच्या सुमारास निंभोरे गावच्या हद्दीतलोणंद-फलटण महामार्गाच्या उत्तर बाजूस असलेल्या कंपाऊंडमध्ये एका व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह अनेक दिवसांपासून झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.कपडे, बूट व आयडी कार्डवरून ओळख
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी अनिकेतच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. यावेळी अनिकेतचा सावत्र भाऊ मनोजकुमार साहेबराव आढाव यांनी मृतदेहावरील कपडे, घटनास्थळी आढळलेले बूट तसेच मोबाईलच्या कव्हरमध्ये असलेले आयडी कार्ड पाहून मृतदेह अनिकेत भोसले याचाच असल्याची खात्री केली.दरम्यान, या घटनेची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. अनिकेतच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत तपासानंतरच अधिक स्पष्टता होणार आहे.


COMMENTS