एक तरी पायी वारी अनुभवावी...
आषाढ महिना आला की वारकऱ्यांना, आळंदीला जाण्याचे वेध लागतात. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर या पायी वारीत सामील होण्यासाठी शेतकरी आपली शेतीची सर्व कामे उरकण्याची लगबग करतो, व्यापारी मंडळी आपल्या उद्योग व्यवसायाची सोय करतात, आणि नोकरदार मंडळी रजा मंजुरीची तजवीज करतात. या पायी वारीचा आळंदी ते पंढरपूर असा रोमहर्षक सोहळा, याची देही याची डोळा अनुभवता येण्यासारखे दुसरे सुख नाही सावळ्या विठुरायाच्या भेटीस निघालेल्या, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान अलंकापुरी म्हणजे आळंदी येथील माऊलींच्या समाधी मंदिरातून होते, त्यावेळी संपूर्ण अलंकापुरी भक्तांच्या मांदियाळीने फुलून गेलेली असते, इंद्रायणीच्या पात्रात भक्तांचा महासागर लोटतो, माऊलींच्या पादुका पालखीत ठेवून गांधी वाड्यात म्हणजे माऊलींच्या आजोळी पालखी मुक्कामाला जाते, त्यावेळी पालखीतील सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात, त्यावेळी *टाळ मृदंगाचा गजर अव्याहत चालू असतो, ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष भक्तिरस पूर्ण गाणे गात, नाचत, फुगड्या, इत्यादी खेळांनी इंद्रायणीचे पात्र मंगलमय होते,* दुसऱ्या दिवशी सकाळी गांधी वाड्यातून माऊलींची पालखी सजवलेल्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान करते, हा सोहळा पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, आणि वाखरी, येथे मुक्काम करून, आषाढ शुद्ध दशमीस पंढरपूर नगरीत प्रवेश करतो.
वारीतील सर्वात अवघड टप्पा म्हणजे दिवेघाट तो घाट सुद्धा हरिनामाच्या गजरात लिलया पार करून वारकरी घाटमाथ्यावर येतात, सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरवा शालू नेसून माऊलींच्या स्वागतासाठी उभ्या राहतात. पालखीचा प्रवास एक शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला असतो. पालखी मुक्कामी आल्यानंतर समाज आरती होते, त्या वेळेचा सोहळा नेत्रांचे पारणे फेडतो, सर्व दिंड्या टाळ मृदंगाचा, अव्याहत गजर करीत अभंगाची बरसात करीत, गोलाकार उभे राहून, नाचत माऊलींचा जयघोष करीत असतात. मध्ये माऊलींची पालखी असते, मानकऱ्यांनी मानदंड वर उंचावून पुकारा केल्यावर सर्व दिंड्यातील वारकरी टाळ वाजवणे त्या क्षणाला बंद करतात, त्यावेळी एवढ्या मोठ्या जनसमुदायांमध्ये सुद्धा निशब्द शांतता असते, ज्या दिंडीची वारी संदर्भात काही तक्रार असेल तेवढीच दिंडी टाळांचा गजर चालू ठेवते, त्या दिंडीच्या प्रमुखांनी तक्रार किंवा अडचण सांगितल्यानंतर गजर बंद करतात. नंतर दिवसभरात वारीमध्ये घडलेल्या घटनांचा आढावा घेतला जातो, हरवलेल्या वस्तूंचा व सापडलेल्या वस्तूंचा पुकारा केला जातो, अशी शिस्त इतर कोठेही पहावयास मिळत नाही, नंतर ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची आरती होते.
आषाढ शुद्ध एकादशीला सर्व दिंड्या पंढरीत नगर प्रदक्षिणा घालतात, सर्व विठ्ठल भक्तांची मांदियाळी वैकुंठ पंढरी नगरीत जमून टाळ मृदंगाचा गजर, आभाळाला गवसणी घालणारा हरिनामाचा गजर, व भाविकांच्या खांद्यावर फडफडणाऱ्या भगव्या पताकामुळे अवघ्या पंढरीला अध्यात्माचा रंग चढलेला असतो. जाईन गे माय तया पंढरपुरा ! भेटीने माहेरा आपुलीया !
या भावनेने विठुरायांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी चंद्रभागेच्या तिरी दाखल होतात, सावळ्या सगुण ब्रह्माचे रूप डोळ्यात साठवयाचे असते, आणि त्या चैतन्यात आणि आनंदात राहून निघायचे, एवढीच एक आस वारकऱ्यांच्या मनात असते, लाखो करोडो पावले अठरा दिवस ऊन पावसाची परवा न करता, एवढी वाट तुडवल्यानंतरही थकत नाहीत,
मूल त्याच्या आईकडे ज्या भावनिक ओढीने धाव घेते, आणि ती भेटल्यानंतर ज्या आनंदात रममाण होते, तशीच अवस्था वारकऱ्यांची होते,
या उत्कट भावभक्ती मुळेच गेले सातशे वर्षे हा प्रवाह अखंड वाहत आहे, अठरा पगड जाती जमातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडत, कुणालाही निमंत्रण न देता, ही वारी अखंडपणे वाटचाल करीत आहे. विठ्ठल माऊलींकडे कोणत्या अनिवार ओढीने ही पावले वळतात, याची उकल अद्यापही कोणाला करता आलेली नाही. या विलक्षण भक्तीचा अर्थ लावण्यासाठी कोणतेही समीकरण उपयोगी पडत नाही, म्हणून हा सोहळा प्रसार माध्यमांद्वारे पाहण्याऐवजी, ऐकण्याऐवजी, आणि हे रहस्य जाणून घेण्यासाठी एवढेच म्हणावे लागेल की,
एक तरी अनुभवावी पायी वारी
श्री रवींद्र परशुराम वेदपाठक
साखरवाडी ता फलटण जिल्हा सातारा फोन नंबर ९९७०७४९१७७