फलटण चौफेर दि १९ मे २०२५
फलटण ते आदर्की फाटा दरम्यान रस्त्याचे काम मागील अडीच वर्षांपासून सुरू असून, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. हे काम कधी पूर्ण होणार, याबाबत ठोस उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.या रस्त्यावर पुलांचे कामही अर्धवट अवस्थेतच आहे. काही ठिकाणी फक्त एका बाजूनेच रस्ता करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूने अजूनही खोदकाम, मुरूम व मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतूक अडथळ्यामुळे होत आहे.सध्या उन्हाळा संपत आला असून लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. मात्र, या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अशक्यच दिसत आहे.
त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाने, म्हणजेच लोणंद मार्गे साताऱ्याला जावे लागत आहे. यामुळे वेळ आणि इंधन खर्च दोन्ही वाढत आहे.या रस्त्याचा सर्वाधिक फटका ऊस वाहतुकीस होत असून, शेतकऱ्यांना त्यांच्या मालवाहतुकीसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, धूळ आणि अपघाताचा धोका वाढला आहे.स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी नागरिक आणि शेतकरीवर्गाकडून होत आहे.