साखरवाडी(गणेश पवार(
कोल्हापूर येथील झालेल्या घटनेच्या अनुषंगाने तसेच आगामी येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अनुषंगाने फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात रूट मार्च काढण्यात आला व शांतता कमिटी व मोहल्ला कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली.
दिनांक ८ रोजी सायंकाळी फलटण शहर पोलिस ठाणे हद्दीत कोल्हापूर येथे झालेल्या जातीय घटनेच्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी ,फलटण विभाग फलटण राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरातून गजानन चौक- टोपी चौक- शंकर मार्केट- गणपती मंदिर -- उमरेश्वर चौक -मलठण मज्जिद -पाचबती चौक -आखरी रस्ता- टेंगूळ चौक -बारामती चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक -डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- स्तंभ चौक- गजानन चौक -महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय असा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च करिता फलटण शहर पोलिस ठाण्याचे 4 अधिकारी, 24 अमलदार, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोडसे ,3 अधिकारी, 19 अंमलदार , लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वायकर, 1 अधिकारी ,5 अमलदार व पोलिस मुख्यालयाकडील 15 अंमलदार असे फलटण उपविभागातील 10 अधिकारी व 63 पोलिस अंमलदार रूट मार्च करिता लाटी हेल्मेट सह हजर होते, तसेच सदर रूट मार्च मध्ये 6 चारचाकी शासकीय वाहने सामील झाली होती.
तसेच दिनांक १० रोजी फलटण शहर पोलिस ठाणे हद्दीत फलटण शहर पोलिस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटी व मोहल्ला कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत जातीय सलोखा राखण्यासाठी व पालखी सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या. सदरची बैठक शांततेत पार पडली. या बैठकी करता मोहल्ला कमिटी व शांतता कमिटीचे 20 ते 22 सदस्य उपस्थित होते अशी माहिती फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.