फलटण चौफेर दि २०मे २०२५
फलटण तालुक्यातील साखरवाडी ते फडतरवाडी रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असून, यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल व खड्डे तयार झाले असून, यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.संबंधित ठेकेदाराकडून पुलाचे काम अपूर्ण ठेवण्यात आले असून, आजूबाजूच्या परिसरात माती व खडीचे ढिगारे पडून आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांना मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. नागरिक व वाहनचालक यामुळे त्रस्त असून, त्यांनी संबंधित ठेकेदाराने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.प्रशासनाकडून पुलाचे काम लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात काम फारच धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ठेकेदार पुलाचे काम कधी पूर्ण करणार?
हा प्रश्न सध्या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशासन व ठेकेदाराने तत्काळ लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.