Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कालबाह्य आयटी उपकरणांच्या बदल्यात नवीन लॅपटॉप व प्रिंटर देण्याची मागणी फलटण तालुका तलाठी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

 


फलटण चौफेर दि १६ डिसेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या फलटण शाखेच्या वतीने तालुक्यातील तलाठ्यांकडे वापरात असलेल्या कालबाह्य व जुनी आयटी उपकरणे तात्काळ बदलून नवीन लॅपटॉप तसेच प्रिंटर-कम-स्कॅनर उपलब्ध करून देण्याची मागणी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सर्व कार्यालयांमधील जुनी व कालबाह्य आयटी उपकरणे बंद करून त्या बदल्यात नवीन व अद्ययावत लॅपटॉप तसेच प्रिंटर-कम-स्कॅनर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या शासन निर्णयाची अद्याप फलटण तालुक्यात अंमलबजावणी झालेली नसून अनेक तलाठी आजही अत्यंत जुनी व वारंवार बिघडणारी उपकरणे वापरण्यास भाग पाडले जात आहेत.


सध्याच्या डिजिटल युगात सातबारा, फेरफार, ई-रेकॉर्ड, विविध प्रमाणपत्रे, ऑनलाइन अहवाल तसेच शासनाच्या विविध पोर्टलवरील कामे ही पूर्णतः संगणकीकृत झाली आहेत. मात्र आवश्यक त्या दर्जाची व कार्यक्षम उपकरणे उपलब्ध नसल्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत असून नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे.फलटण तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयांना तातडीने नवीन लॅपटॉप व प्रिंटर-कम-स्कॅनर उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून शासनाच्या ऑनलाइन सेवा सुरळीत व वेळेत देता येतील, अशी ठाम मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास यापुढे ऑनलाइन स्वरूपाचे कोणतेही काम करण्यात येणार नाही, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागणीबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या मागणीमुळे तालुक्यातील महसूल कार्यालयांच्या कामकाजाबाबत पुढील काळात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.