Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण नगरपरिषदेसाठी ७० टक्के मतदान उद्या निकाल, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष फलटणकडे



फलटण चौफेर दि २० डिसेंबर २०२५

फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून उद्या होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोन बलाढ्य राजकीय घराण्यांतील उमेदवार आमनेसामने असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे.सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहरातील सर्व प्रभागांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. एकूण २३,६७८ मतदारांनी आपला हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७०.२९ टक्के इतकी नोंदवली गेली आहे.

मतदान केलेल्या मतदारांमध्ये पुरुष मतदारांची संख्या १५,८५९, तर महिला मतदारांची संख्या १६,१२९ इतकी आहे. याशिवाय २ इतर मतदारांनीही मतदान केले. एकूण मतदारसंख्या ३१,९९० असून मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढलेली दिसून येत आहे.नगराध्यक्ष पदासाठी यंदा विशेष लक्षवेधी लढत पाहायला मिळाली आहे.माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अ‍ॅड. अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.


शहरातील सर्वच  प्रभागांमध्ये मतदानाचा टक्का निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः युवक आणि महिला मतदारांचा कल कुणाकडे गेला, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे.दरम्यान, उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. फलटण नगरपरिषदेचा निकाल केवळ शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

फलटणचा नगराध्यक्ष कोण होणार?याचा फैसला उद्याच्या निकालातून होणार असून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.