Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण नगरपरिषद भाजपच्या ताब्यात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा ६०० मतांनी थरारक विजय



फलटण चौफेर दि २१ डिसेंबर २०२५

संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली असून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र ॲड. अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा ६०० मतांनी पराभव केला. एकूण २७ जागा असणाऱ्या फलटण नगर परिषद मध्ये भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने १८ जागांवर विजय मिळवला असून उर्वरित ९ जागांवर राजे गट (शिवसेना एकनाथ शिंदे गट) यांनी  विजय मिळवला

ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये केवळ ५० ते १०० मतांची तफावत कायम होती. प्रत्येक फेरीत चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र तिसऱ्या फेरीअखेर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सहाशे मतांची निर्णायक आघाडी घेतली आणि ती आघाडी शेवटपर्यंत कायम राखण्यात ते यशस्वी ठरले.पाच फेऱ्यांत झालेल्या मतमोजणीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना १६,४८९ मते, तर ॲड. अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना १५,८८९ मते मिळाली. या निवडणुकीत ‘नोटा’ला ३४१ मते पडली.या निकालामुळे मागील ३५ वर्षांपासून फलटण नगरपरिषदेवर असलेली राजे गटाची सत्ता संपुष्टात आली असून भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयाकडे केवळ फलटणच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून होते.

विजयानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. विजयाचे श्रेय मतदारांच्या विश्वासाला देत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.या निकालाने फलटणच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले असून भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर हे फलटणचे नवे ‘कारभारी’ म्हणून जनतेने त्यांना संधी दिली आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.