फलटण चौफेर १० डिसेंबर २०२५
५ डिसेंबर रोजी झालेल्या जागतिक मृदा दिनानिमित्ताने कृषी महाविद्यालय, फलटणच्या कृषीदूतांनी तिरकवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मातीचे नमुने शास्त्रीय पद्धतीने कसे गोळा करावेत, याचे प्रात्यक्षिक आयोजित केले. यावेळी शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस जगभरात 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश निरोगी मातीचे महत्त्व आणि शाश्वत मृदा व्यवस्थापनाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. यंदाच्या वर्षीच्या "निरोगी शहरांसाठी निरोगी माती" या संकल्पनेनुसार, कृषीदूतांनी ग्रामीण आणि शहरी भागातील मातीच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले.
या उपक्रमादरम्यान, कृषीदूतांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याची वैज्ञानिक पद्धत समजावून सांगितली. चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या नमुन्यांमुळे अहवाल दिशाभूल करणारे ठरू शकतात, त्यामुळे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे होते.
प्रात्यक्षिकादरम्यान शिकवलेले महत्त्वाचे टप्पे:
१) V' आकाराचा खड्डा : शेतातील वेगवेगळ्या ६ ठिकाणांहून इंग्रजी 'व्ही' (V) आकाराचे खड्डे घेऊन, त्यातील २ इंच जाडीचा मातीचा थर कापून नमुने कसे गोळा करावेत, हे दाखवण्यात आले.
२) नमुना मिसळणे: गोळा केलेले नमुने एका स्वच्छ पोत्यावर एकत्र करून, हाताने चांगले मिसळून त्याचे चार भाग करणे आणि त्यातील समोरासमोरील दोन भाग बाजूला काढण्याची प्रक्रिया स्पष्ट केली गेली.
वर्ज्य जागा:खते साठवण्याची जागा, झाडांखालील जागा किंवा पाण्याचे पाट यांजवळून नमुने घेणे कसे टाळावे, याबद्दल मार्गदर्शन केले. मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्या वापरू नयेत, असे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा जी .बी.अडसूळ, प्रा. जी. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत तुषार अभंग, अनुप बनकर, अजय बिचुकले, अथर्व डाके, ऋषिकेश जाधव, संग्राम जगताप, साहिल बनसोडे यांनी कार्यक्रम आयोजित केला.
