फलटण चौफेर दि १७ ऑक्टोबर २०२५
सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर सामना कोणाचा होणार याची स्पष्टता झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत, नगराध्यक्ष पदाची सरळ लढत समशेरसिंह नाईक-निंबाळकर विरुद्ध अनिकेत राजे नाईक-निंबाळकर अशी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
महायुतीकडून भाजप पुरस्कृत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनासह दाखल करण्यात आला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक-निंबाळकर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या माध्यमातून औपचारिकरीत्या उमेदवारी अर्ज दाखल केला.
मागील काही आठवड्यांपासून अनिकेत राजे विरुद्ध समशेरसिंह नाईक-निंबाळकर अशीच थेट लढत होणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करून नगराध्यक्षपदासाठी तयारी करणारे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्यामुळे चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. फलटण नगरपालिका क्षेत्रातील नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गात जाहीर झाल्यानंतर त्यांनी सक्रिय तयारी सुरू केली होती. परंतु अखेर त्यांनी अर्ज दाखल न केल्याने मुकाबला पुन्हा दोन निंबाळकर घराण्यांमध्येच केंद्रित झाला आहे.
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांचे व स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष फलटण येथील निवडणूक कार्यालयाकडे लागले होते. अखेर दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत नाईक-निंबाळकर कुटुंबातील दोन भिन्न राजकीय गटांतील प्रतिनिधीच आमने-सामने उभे ठाकले आहेत.येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येणार असून, ही निवडणूक फलटणच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक रोचक निवडणुकांपैकी एक ठरणार यात शंका नाही.


