फलटण चौफेर दि १९ नोव्हेंबर २०२५
लोणंद येथील महाराष्ट्र वखार महामंडळात तब्बल कोट्यवधी रुपयांच्या गहू व तांदळाच्या अफरातफरीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. वखार गोदामातून तब्बल ४,१३६ पोती धान्य गायब झाल्याचा धक्कादायक खुलासा भारतीय खाद्य निगमच्या तपासणीत झाला असून या संपूर्ण प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाखो किलो गहू–तांदूळ गोदामातून बाहेर कसे गेले? लोणंद रेल्वे मालधक्क्यावर भारतीय खाद्य निगमकडून गहू व तांदूळ उतरवले जातात आणि नंतर ट्रकद्वारे कापडगाव हद्दीतील वखार महामंडळाच्या गोदामात साठवले जातात. येथून फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव या तालुक्यांना रेशनिंगसाठी धान्य पुरवठा केला जातो. जवळपास २० हजार ४४० मे.टन क्षमतेच्या या केंद्रावर १४ मोठी गोदामे असून २०१६ ते २०२४ या काळात समीर अशोक नाडगौडा हे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते.भारतीय खाद्य निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ११ आणि १२ ऑगस्ट २०२४ रोजी तपासणी केली असता २,९०१ पोती गहू आणि १,२३५ पोती तांदूळ कमी असल्याचे आढळले. काही पोत्यांची अतिरिक्त नोंद असली तरी एकूण ८७ लाख ७६ हजार रुपयांच्या अपहाराचा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे. या गंभीर घोटाळ्यानंतर नाडगौडांचे निलंबन करण्यात आले; परंतु काही महिन्यांतच त्यांची नागपूर येथे पुनर्नियुक्ती करण्यात आल्याने या प्रकरणात अनेक ‘बडे’ लोक सामील असल्याची चर्चा जोमात आहे.
चार हजारपेक्षा जास्त पोती विनापरवाना गोदामाबाहेर गेली तरी देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. गरीबांच्या ताटातील धान्यावर डल्ला मारणाऱ्या या रॅकेटमध्ये केवळ खालच्या पातळीवरील कर्मचाऱ्यांपुरते दोषी मर्यादित नसून वरपर्यंत हात असावेत, असा संशय नागरिकांमध्ये बळावत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर लोणंद पोलिसात अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे


