फलटण चौफेर दि १७ नोव्हेंबर २०२५ : फलटण नगरपालिका निवडणुकीची हवा तापू लागली असताना काँग्रेस पक्षाने आज आपली ताकद दाखवत नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवाराचा अर्ज दाखल केला. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी नगराध्यक्ष पदासह प्रभाग क्रमांक १३ साठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या कडे सादर केला.अर्ज दाखल करताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे ढग दाटले होते. फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहराध्यक्ष पंकज पवार, तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत विकास हा प्रमुख मुद्दा ठरवण्याचा काँग्रेसचा संकल्प असून, सचिन सूर्यवंशी यांची उमेदवारी ही त्या दिशेने पुढे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
गेल्या काही वर्षांत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांमुळे सचिन सूर्यवंशी यांनी प्रभागात भक्कम संपर्क व विश्वास निर्माण केला आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, यामुळेच त्यांच्या नावाला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.फलटण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून दाखल झालेली ही पहिली मोठी उमेदवारी असून, पुढील दिवसांत निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


