फलटण चौफेर दि २९ नोव्हेंबर २०२५
फलटण नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांसाठी लांबणीवर पडली असून, यामागे न्यायालयातील दिरंगाई कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे हा संपूर्ण प्रश्न निर्माण झाला.
नियमानुसार जिल्हा न्यायालयाने या याचिकेवरील निकाल ३ दिवसांत द्यायचा होता. मात्र प्रत्यक्षात न्यायालयाने निकाल देण्यासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी घेतला. या अनपेक्षित विलंबाचा थेट परिणाम निवडणूक आयोगाने आखलेल्या वेळापत्रकावर झाला आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोलमडली.या विलंबाविरोधात संबंधित पक्षांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या याचिकेचा निकाल आता लागला असून त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या दिरंगाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत स्वतः निवडणूक आयोगही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत नव्या वेळापत्रकासंदर्भात निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
फलटण नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतील या मोठ्या घडामोडीकडे सध्या तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

