फलटण चौफेर दि ३० नोव्हेंबर २०२५
फलटण व महाबळेश्वर नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलल्यानंतर, बारामती नगरपरिषद निवडणूकही लांबणीवर पडली असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अध्यादेश जारी करत अधिकृत घोषणा केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणच्या नगरपरिषद निवडणुकांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे किंवा संबंधित न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे, अशा नगरपरिषदांच्या निवडणुका पूर्वनियोजित २ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहेत.फलटण आणि बारामती या दोन्ही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने आयोगाने कायदेशीर मत मिळवून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवार, राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये नव्याने चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता होती आणि प्रशासनिक घडामोडी सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त काळ देण्यात येत आहे.आता बारामती आणि फलटण दोन्ही नगरपरिषदांसाठी नव्या तारखेनुसार २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक वातावरणात पुन्हा एकदा चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

