फलटण चौफेर दि २७ ऑक्टोबर २०२५
दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान, दुधेबावी यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “कृषिरत्न” पुरस्कार यंदा सुरवडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील विशाल भालचंद्र गाडे यांना प्रदान करण्या येणार आहे.कृषी क्षेत्रातील त्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्पादनक्षम शेतीचा आदर्श याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे.विशाल गाडे यांनी ऊस शेतीत एकरी १०० टनांपर्यंत विक्रमी उत्पादन घेऊन दाखवले आहे.
तसेच त्यांनी रेशीम उद्योगात यशस्वी वाटचाल करत फळभाज्यांमध्ये — वांगी, कारले, ढोबळी मिरची, चवळी, ढेमसा, खरबूज, कलिंगड इत्यादी पिकांमध्ये योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि आधुनिक पद्धती अवलंबून उत्पादन खर्च कमी करत नफ्याची शेती साधली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी आज आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. यंत्रसामग्रीचा सुयोग्य वापर, नव्या कल्पना आणि शेतीत सातत्यपूर्ण प्रयोगशील वृत्तीमुळे विशाल गाडे हे आदर्श युवा शेतकरी आणि प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानने त्यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग दाखवणारे युवा शेतकरी म्हणून विशाल गाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


