Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माफी न मागितल्यास अब्रूनुकसानीचा दावा : अॅड. धीरज घाडगे यांची सुषमा अंधारे यांना नोटीस

 






फलटण चौफेर दि. २८ ऑक्टोबर २०२५

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि मानहानीकारक असल्याचा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अंधारे यांना ५० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, ४८ तासांच्या आत सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. धीरज घाडगे, अॅड. नरसिंह निकम आणि अॅड. सचिन शिंदे यांनी ही माहिती दिली. या वेळी अॅड. घाडगे म्हणाले की, “अंधारे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही, हे फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या लेखी पत्रातून स्पष्ट झाले आहे.”त्यांनी पुढे सांगितले की, “अंधारे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर २७७ गुन्हे दाखल आहेत; मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. उलट, त्यांच्या सोबत बसलेल्या काही व्यक्तींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे रेकॉर्डवर आहे.”अॅड. घाडगे यांनी यावेळी सांगितले की, “डॉ. संपदा मुंडे प्रकरणाचा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे चुकीची माहिती पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करणे हा गंभीर प्रकार आहे.”


तसेच अॅड. धीरज घाडगे यांनी स्पष्ट केले की, “सुषमा अंधारे यांनी ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले, त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आरोप मागे घ्यावेत आणि माफी मागावी, अन्यथा न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.”यावेळी अॅड. घाडगे यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधले की, फलटण तालुक्यात “रणजित निंबाळकर” या नावाच्या इतर व्यक्ती आहेत. त्यामुळे चुकीची ओळख निर्माण करून राजकीय हेतूने अफवा पसरविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.