फलटण चौफेर दि २८ ऑक्टोबर २०२५
लोणंद येथील माळीआळीत शिक्षणासाठी भाड्याने राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, लोणंद पोलिसांनी केवळ दोन तासांत या गुन्ह्याचा छडा लावून संशयिताला ताब्यात घेतले.ही घटना उघडकीस आली तेव्हा डायल 112 वरून एका विद्यार्थ्याने फोन करून आपल्या रूममधील मित्राचा खून झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृत तरुण गणेश संतोष गायकवाड (वय २२, रा. पिंपळखुटी ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. लोणंद) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोणंद पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताकडे सखोल चौकशी केली असता त्याने अल्पवयीन संशयित काही प्रश्नांची उत्तरे टाळली. पोलिसांच्या हुशारीपुढे अखेर त्याने नांग्या टाकत क्षणिक रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली. संबंधित संशयित हा विधी संघर्ष बालक असून त्याला मा. बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट व डॉग स्कॉड पथकांनी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत.या यशस्वी कारवाईत लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुशिल भोसले, पोठनि रोहित हेगडे, तसेच हवालदार राम तांबे, राहुल वाघ, नितीन भोसले, सतिश दडस, प्रमोद क्षीरसागर, योगेश कुंभार, बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, सचिन कोळेकर, अवधूत धुमाळ, संजय चव्हाण, शेखर शिंगाडे आदींनी सहभाग घेतला.


