साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
न्यू फलटण शुगर वर्क्स व त्यांच्या प्रोव्हिडंट फंड ट्रस्टमधील सदस्य तथा कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी (PF) व पेन्शन संबंधित अडचणींवर मार्ग काढण्यासाठी महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला आहे.दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या KYC व इतर आवश्यक कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधीचे प्रकरणे ईपीएफओ (Employees Provident Fund Office) कोल्हापूर येथे प्रलंबित होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राजेंद्र भोसले यांनी मा. उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथे विनंती केली होती.
या अर्जावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने कोल्हापूर भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या अडचणींची थेट पाहणी करून त्या सोडविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भविष्यनिर्वाह निधी विभागाचे अधिकारी फलटण येथे प्रत्यक्ष भेट देऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार आहेत. हे विशेष शिबिर दि. 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर तसेच दि. 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 9.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर श्री. दत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखाना परिसरात पार पडणार असून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध राहतील.सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपली KYC व इतर आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांचे PF आणि पेन्शन संदर्भातील प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवता येतील.या निर्णयामुळे न्यू फलटण शुगर वर्क्सच्या शेकडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


