फलटण चौफेर दि. ११ सप्टेंबर २०२५
लोणंद-फलटण रोडवरील तरडगाव (ता. फलटण) येथील उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर चारचाकी वाहनासह पसार झालेल्या वाहनचालकास लोणंद पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले. यशराज जितेंद्र घाडगे (वय २३, रा. नागठाणा, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित वाहन चालकाचे नाव आहे याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास फलटणकडे जाणाऱ्या लेनवर एका महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. MH45 AZ 4447) चालकाने हयगयीने वाहन चालवून मोटारसायकलस्वारास पाठीमागून जोराची धडक दिली होती. यात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
अपघाताचा तपास करताना लोणंद पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाचा मागोवा घेतला. वाहन महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ-एन असून त्याचा चालक यशराज जितेंद्र घाडगे (वय २३, रा. नागठाणा, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलीसांनी संशयितासह वाहन वेळापूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत घाडगे याने अपघात केल्याची कबुली दिली आहे.सदर प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप येळे करीत आहेत.ही कारवाई मा. तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा), मा. डॉ. वैशाली कडुकर (अपर पोलीस अधीक्षक, सातारा), मा. विशाल खांबे (उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण) यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी सपोनि सुशिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोउनि रोहित हेगडे, उपनिरीक्षक विजय पिसाळ, हवालदार बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर व अमोल जाधव यांनी सहभाग घेतला.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण तपास पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.