फलटण चौफेर दि. ११ सप्टेंबर २०२५
सातारा जिल्हा परिषदेतर्फे “मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियान” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण विकास व पंचायत राज क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत सुरवडी व सरपंच सौ. शरयू जितेंद्र साळुंखे-पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. जयकुमार गोरे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभुराज देसाई यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यशाळेला जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. यशनी नागराजन, डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,ग्रामसेवक शशिकांत माने यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामविकास क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारानंतर बोलताना सरपंच सौ. शरयू साळुंखे-पाटील म्हणाल्या, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून संपूर्ण ग्रामपंचायत टीम व गावकऱ्यांच्या सहकार्याचा परिणाम आहे. या गौरवामुळे सामाजिक बांधिलकी अधिक जोमाने पार पाडण्याची प्रेरणा मिळाली आहे.”ग्रामीण भागातील विकासात्मक उपक्रमांची दखल घेऊन देण्यात आलेला हा सन्मान सुरवडी ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव ठरला आहे.