फलटण चौफेर दि १७ सप्टेंबर २०२५
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मंगळवारी सायंकाळी भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. जुन्या भांडणाच्या कारणावरून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला असल्याचा प्राथमिक अंदाज असून यात रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (वय ४०) किरकोळ जखमी झाला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ५ वाजून १४ मिनिटांनी शिरवळ रेस्ट हाऊस चौकात ही घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत (फलटण अतिरिक्त चार्ज), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर व फलटण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बदणे सह शिरवळ पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनीही घटनास्थळी भेट दिली.