संतश्रेष्ठ योगीराज श्री गुणानाथ महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्यांच्या चरित्रात्मक पुस्तकाची प्रथम आवृत्ती चरणी अर्पण करण्यात आली. योगीराज गुणानाथ महाराजांनी शके १७४२ (इ.स. १८२०) मध्ये याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली होती. त्यांच्या समाधीला यंदा २०५ वर्ष पूर्ण होत आहेत.मंदिर शिखराचे बांधकाम सुरू असल्याने पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन सोहळा शिखर कलशारोहणाच्या दिवशी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. पुस्तकात संतांचे चरित्र, अध्यात्मिक विचार, अभंग निरूपण आदी माहिती समाविष्ट आहे.संत-महात्मे जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात, याचा उल्लेख करताना संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा संदर्भ पुस्तकात देण्यात आला आहे. “संत हे स्वतः झिजून इतरांना सुगंध देणारे चंदनासारखे असतात,” असा भावार्थ अभंगातून स्पष्ट करण्यात आला आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संतांचा वसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. लेखक श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक (साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी हे चरित्रात्मक पुस्तक साकारले असून त्यांचा उद्देश संतांच्या शिकवणीचा प्रसार करून भक्तिभाव, नैतिक धर्माचरण व विठ्ठल नामस्मरणाचा प्रसार करणे हा आहे.पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर माउली, तुकाराम महाराज की जय!