फलटण चौफेर दि २६ ऑगस्ट २०२५
फलटण तालुक्यातील खामगाव गावातील ५ सर्कल भागातील रस्त्यावर गटाराचे पाणी वाहू लागल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. रस्त्यावरील डबकी व साचलेल्या घाणीमुळे रोगराई पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे.या भागात गटार व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहते. स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने पूर्णपणे कानाडोळा केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. "गटाराची व्यवस्था नाही तर किमान मुरूम टाकून खड्डे तरी भरावेत," अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
खामगाव ग्रामपंचायतीचा तुगलकी कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून, गोसावी वस्ती, फुलेंनगर व आता ५ सर्कल भागातील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते व स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे.या भागात १ ते १.५ हजार लोकसंख्या असूनही एकही कचरा कुंडी नाही. घंटा गाडी न आल्याने रहिवाशांना कचरा थेट निरा उजवा कालव्याच्या भराव्यावर टाकावा लागतो. परिणामी पर्यावरणीय धोकाही वाढला आहे. नागरिकांनी तात्काळ कारवाई करून रस्ते व गटार समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
मागील कित्येक दिवसांपासून आमच्या घरासमोर गटाराचे पाणी साठत आहे यावर वारंवार ग्रामपंचात प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा परिस्थिती जैसे थै आहे यावर तातडीने ग्रामपंचायतने योग्य कार्यवाही करावी दीपक काटकर ग्रामस्थ