फलटण चौफेर दि २६ ऑगस्ट २०२५
फलटण तालुका परिसरात सातत्याने शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कारवाई करत सहा इसमांना दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
तडीपार झालेल्यांमध्ये संशयित टोळी प्रमुख स्वप्निल रमेश निकम (वय २८), तसेच सदस्य रोहन रविंद्र उर्फ बाळासाहेब निंबाळकर (२४), ज्ञानेश्वर उर्फ माऊली हिराचंद निंबाळकर (३५), सागर संभाजी निंबाळकर (३५), सुरज उर्फ सोनु धनाजी भोईटे (३०) व विनोद भिकोजी उर्फ भिमराव भोईटे (३९, सर्व रा. राजाळे, ता. फलटण) यांचा समावेश आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल आहेत.
फलटण तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यावर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी चौकशी केली. तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी सुनावणी घेऊन सदर टोळीला दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला.
या कारवाईमुळे टोळीचा सततचा उपद्रव थांबणार असून आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा जिल्ह्यात अशा सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी, मोक्का, एमपीडीएसारख्या कठोर कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सरकार पक्षातर्फे अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.हया. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी निसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे वैभव सुर्यवंशी यांनी पुरावे सादर केले.