फलटण चौफेर, दि. १६ ऑगस्ट २०२५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर येथे "हर घर तिरंगा २०२५" या मोहिमेअंतर्गत दिनांक २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा राखी बनवण्याची स्पर्धा व कार्यशाळा तसेच "हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता" उपक्रम राबविण्यात आले.तर इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या भिंती सजवणे, वीर जवानांना पत्रलेखन, तिरंगा राखी स्पर्धा व कार्यशाळा, तिरंगा रॅली तसेच तिरंगा प्रतिज्ञा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१५ ऑगस्ट रोजीचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूल कमिटीच्या व्हाईस चेअरमन आदरणीय सौ. वसुंधरा राजीव नाईक-निंबाळकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास संस्था तपासणी अधिकारी सौ. निर्मला रणवरे मॅडम, स्कूल कमिटीचे निमंत्रित सदस्य श्री. ज्ञानेश्वर देशमुख सर, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. लोंढे मॅडम उपस्थित होत्या. तसेच माजी सैनिक कॅप्टन रहमान शेख सर व श्री. शंकर काटकर सर यांचा सत्कार करण्यात आला."कैलासवासी अच्युत दत्तात्रय स्मृती हरित वसुंधरा" उपक्रमांतर्गत डॉ. प्राची बर्वे व डॉ. महेश बर्वे यांनी दिलेल्या रोपांचे वृक्षारोपण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, पोवाडा, सिंहगर्जना, देशभक्तीपर गीत, कवायत, समाज सुधारक वेशभूषा सादरीकरण, तसेच "ऑपरेशन सिंदूर" ही नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मा. चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शितोळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमानंतर पालक-दाते यांनी दिलेल्या खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.