फलटण चौफेर दि २ ऑगस्ट २०२५
खामगाव येथील कातकरी समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा घरकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. प्रधानमंत्री जनमन घरकुल योजनेअंतर्गत या वस्तीतील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे आज लोकार्पण आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.गतविधानसभेच्या निवडणुकीत आमदार सचिन पाटील यांनी या वस्तीतील नागरिकांना जागेसहित घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करून या योजनेची अंमलबजावणी सुनिश्चित केली.
लोकार्पणप्रसंगी आमदार सचिन पाटील म्हणाले, “लोकसेवेचं काम झाल्यानंतर जो आनंद मिळतो, तो इतर कशातही मिळत नाही. मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सदैव माझ्या जनतेच्या पाठीशी राहीन.” त्यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि अडचण आल्यास जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, महानंदचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, युवा नेते विक्रम आप्पा भोसले, सिराजभाई शेख, अमोल खराडे, राजेंद्र कुचेकर, गणेश पिसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे कातकरी वस्तीतील आदिवासी कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्णत्वास गेले असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.