फलटण चौफेर दि ५ ऑगस्ट २०२५
कापशी ता फलटण गावचे जागृत व ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने संपन्न झाला. श्रावण महिन्यातील पवित्र मुहूर्तावर या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे देवतांना निरा नदीवर नेऊन स्नान घालण्याची परंपरा. या सोहळ्यात संपूर्ण गाव एकत्र येतो व भक्तिभावाने स्नान विधी पार पाडतो. या वेळी विविध धार्मिक पूजा-अर्चा, अभिषेक, आणि भजन कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण पालखी सजवण्यात आली होती आणि ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीने नटलेली पालखी भक्तांसह निरा नदीच्या तीरावर पोहचली. स्नान विधीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन भोजन करतात.या सोहळ्यामुळे गावामध्ये एकात्मतेची भावना दृढ होते आणि ग्रामदैवतांप्रती असलेली श्रद्धा अधिक बळकट होते. अनेक वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने व उत्साहाने सुरू आहे.