फलटण चौफेर दि १३ ऑगस्ट २०२५
घराघरात विश्वासाची परंपरा निर्माण करणाऱ्या के. बी. उद्योग समूहाच्या प्रकल्प गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या यशस्वी प्रवासात आणखी एक टप्पा गाठला आहे. नुकताच केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून गॅलेक्सीला मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे आता गॅलेक्सीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्राच्या पलीकडे इतर राज्यांपर्यंत विस्तारले जाणार असून, सभासदांना अधिक व्यापक आर्थिक सेवा मिळणार आहेत.
के. बी. एक्सपोर्टच्या माध्यमातून गॅलेक्सी अनेक शेतकऱ्यांशी जोडलेली असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत आहे. सध्या गॅलेक्सीची सभासदसंख्या १०,००० पेक्षा अधिक असून, ४९ कोटी रुपयांच्या ठेवी व ३९ कोटी रुपयांच्या कर्जाचे यशस्वी वितरण केले आहे. एकूण ८८ कोटी रुपयांचा व्यवसाय, फलटण, राजाळे, साखरवाडी आणि पिंपरी चिंचवड येथे शाखा कार्यरत आहेत, तर लवकरच बारामतीत नव्या शाखेचे उद्घाटन होणार आहे. संस्थेमुळे ८० हून अधिक कर्मचाऱ्यांना स्थिर रोजगार मिळाला आहे.गॅलेक्सीने सलग चार वर्षे बँको ब्ल्यू रिबिन पुरस्कार पटकावत उत्कृष्ट सेवांचा मान राखला आहे, तसेच सातत्याने ‘ऑडिट वर्ग अ’ दर्जा टिकवून ठेवला आहे. प्रत्येक शाखेत अत्याधुनिक गोल्ड टेस्टिंग मशीनची सुविधा असून, एन.पी.ए. १% पेक्षा कमी राखण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, एकूण कर्जापैकी ५०% पेक्षा अधिक कर्ज सुरक्षित सोने तारण स्वरूपात दिले जाते.
संस्थेचे संस्थापक व चेअरमन श्री. सचिन यादव यांनी यशाबाबत समाधान व्यक्त करत सांगितले की, “गॅलेक्सीचा उद्देश केवळ आर्थिक सेवा पुरवणे नाही, तर प्रत्येक सभासदाचा सर्वांगीण विकास आणि आर्थिक स्वावलंबन घडवणे हा आहे. मल्टिस्टेट मल्टिपर्पज परवाना मिळाल्यामुळे आम्हाला विविध राज्यांमध्ये ठेवी, कर्ज, गुंतवणूक योजना व इतर सेवा पुरवून सहकारी क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्याची संधी मिळाली आहे.”गॅलेक्सी येत्या काळात महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन शाखा सुरू करून प्रत्येक घराशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प करत आहे