फलटण चौफेर दि १ ऑगस्ट २०२५
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील पोलीस पाटील सौ. पल्लवी शरद पवार पाटील यांना जिल्हास्तरीय ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि प्रशासनाला सहकार्य करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यामिनी नागराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. पल्लवी पवार पाटील यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे धुमाळवाडीसह संपूर्ण फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
महसूल दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महसूल विभागाच्या कामाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “महसूल प्रशासन हे शासनाचा कणा असून, ते थेट नागरिकांशी जोडलेले आहे. पोलीस पाटील हे या प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. गावपातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यापासून ते शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यापर्यंत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.”जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यामिनी नागराजन यांनी सौ. पल्लवी पवार पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. “आज महिला केवळ घराचीच नव्हे, तर गावातील प्रशासनाचीही धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. सौ. पल्लवी पवार यांनी आपल्या कामातून हे सिद्ध केले आहे. त्यांचे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे,” असे त्या म्हणाल्या.
सौ. पल्लवी पवार पाटील यांनी आपल्या कार्यकाळात गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. स्थानिक वाद मिटवणे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाला तातडीने माहिती देऊन मदतकार्यात सहभाग घेणे, अशा अनेक बाबींमध्ये त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि प्रभावी संवाद कौशल्यामुळे त्यांची पोलीस पाटील म्हणून निवड गावासाठी एक आदर्श ठरली आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना सौ. पल्लवी पवार यांनी जिल्हा प्रशासन आणि ग्रामस्थांचे आभार मानले. "हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या गावासह धुमाळवाडीतील ग्रामस्थांचा आहे," असे त्या म्हणाल्या.या कार्यक्रमात महसूल विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उत्कृष्ट काम केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. पल्लवी शरद पवार यांचे फलटण उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, तुषार देशमुख, गुंजवटे रावसाहेब, पोलीस पाटील संघटनेचे मार्गदर्शक अरविंद मेहता, निवृत्त नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, पोलीस व महसूल प्रशासन तसेच सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटना अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष संतोष पवार व सर्व पोलीस पाटील यांनी अभिनंदन केले.