Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"लोकरी माव्याचा जैविक शेवट, महाराष्ट्राच्या ऊसाला नवा प्रारंभ!"

  


महाराष्ट्रातील उसावरील लोकरी मावा ही ऊसावर येणारी एक गंभीर कीड आहे. ही कीड उसाच्या रसावर उपजीविका करते, ज्यामुळे उसाची वाढ खुंटते, गळ होतो आणि उत्पादनात मोठी घट येते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास काही वेळा तात्पुरता परिणाम दिसतो, पण पर्यावरणावर व मातीच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. सन २००२ या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस पिकाचे गंभीर नुकसान झाले. लोकरी माव्याच्या तीव्र प्रदुर्भावामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात घट झाली त्याच बरोबर ऊसामधील साखरचे प्रमाण ३५ टक्क्याने घटले . त्या काळात सांस्कृतिक, यांत्रिक, रासायनिक आणि जैविक साधनांचा वापर करण्यात आला, परंतु किटकांवर नियंत्रण झाले नाही. यशाची गुरुकिल्ली वैज्ञानिकांना फक्त जैविक व्यवस्थापनेद्वारे आणि नैसर्गिक शत्रूचा ऊसावरिल लोकरी माव्यासाठी वापर करणे यातून मिळाली.


ऊसावरील लोकरी माव्यामुळे होणारे नुकसान :

पूर्वीच्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की, ऊस वाण को-८६०३२ मध्ये २१.४३ टक्के उत्पादनात घट झाली, तर ऊस वाण को - ९५०३२ मध्ये साखरेच्या पुनरप्राप्तीत २.०४ युनिट्स ने घट झाली ते फक्त उसावरील लोकरी माव्याच्या प्रदुर्भावमुळे. महाराष्ट्रा मध्ये २००२-३, २००३-४ आणि २००४-५ अनुक्रमे २५, ४० आणि २३ टक्क्याने, ऊस लागवडीत घट झाली आणि ऊसाची उत्पादकता अनुक्रमे ६.५०, २२.५० आणि ७.५० टन प्रती हेक्टरने कमी झाली. ऊसावरील लोकरी माव्याच्या हल्ल्यामुळे एकूण नुकसान रुपये ७३८ कोटी इतके झाले.  तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे भागात लोकरी माव्याचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.


रासायनिक किटकनाशकांचे अपयश :

लोकरी मावा ऊसावर आक्रमक किटक असल्याने, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मिथाइल पॅराथिओन २% २० किलो प्रती हेक्टर सारख्या रासायनिक किटकनाशकांचा वापर ऊसावरील लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी केला गेला. परंतु यामुळे तात्पुरता दिलासा मिळवला. पण तरीही लोकरी मावा नियंत्रणात आला नाही. रासायनिक किटकनाशकांचा वारंवार आणि सतत वापर केल्यामुळे ऊसामधील कार्यक्षमता कमी झाली. या रसायनांचा वापर शेतकऱ्यांना किफायतशीर नव्हता आणि या रसायनांमुळे पर्यावरणीय प्रदूषण होते.


जैविक नियंत्रणाची सुरुवातः

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पंढरीनाथ धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने जैविक उपायांचा अवलंब सुरु झाला. 

मुख्य जैविक उपायः१. क्रायसोपेरला : ही एक फायदेशीर भुंगेरी आहे जी लोकरी मावा खाऊन नष्ट करते. एका भुंगेरीची अंडी, अळी व प्रौढ अवस्थेत ती हजारो कीटक फस्त करू शकते.

२. मायक्रोमस इगोरोटस : हा छोटा परजीवी कीटक असून माव्याच्या अळ्यांवर परजीवित्व करतो. ऊसावर नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतो.

३. जैविक फवारणी : कडुनिंबाचे तेल (५ मिली/लिटर) + साबणाचे पाणी हे मिश्रण वापरून मावा नियंत्रण.१० दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास परिणामकारक नियंत्रण मिळते.

४. शेतीतील नैसर्गिक मित्र कीटकांचे संवर्धन: किटकनाशकांचा अतिरेक टाळून मित्र कीटकांना वाव देणे. मिश्र पिक पद्धती आणि समतोल खत व्यवस्थापन यामुळे कीड नियंत्रण अधिक सुलभ होते.


महाराष्ट्रातील ऊसावरील लोकरी माव्याचे सर्वेक्षण-

एआयसीआर‌पी (अखिल भारतीय समन्वित  जैविक कीड नियंत्रण प्रकल्प) , एनबीएआयआर (राष्ट्रीय कृषी कीटक संसाधन ब्युरो) , सीएसआरएस ( मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ) , पाडेगांव, व्हीएसआय ( वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ) आणि एनजीओज मध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी ऊस पिकवणाऱ्या क्षेत्रात सर्वेक्षण केले आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सारख्या अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ऊसावरिल लोकरी माव्यांच्या घटनांवर निरीक्षणे नोंद‌विली. या सर्वेक्षणात, एनबीआयआर आणि एआयसीआरपी (जैवनियंत्रण) मधील किटकशास्त्रज्ञांनी लोकरी माव्याच्या वसाहतीमधून त्यांचे नैसर्गिक शत्रु गोळा केले आणि वर्गीकरणतज्ञांकडून ओळखले . वैज्ञानिकांनी शिकारीच्या ३ प्रजाती आणि १ परजीवी आशी नोंद केलेली आहे .


फील्ड रिलिझसाठी (प्रादुर्भावी क्षेत्रात सोडणे) शिकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन :


डिफा अफिडीवोरा मध्ये ऊसावरील लोकरी मावा खाण्याची चांगली क्षमता आहे. म्हणूनच डिफा आणि मायक्रोमस मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची सोपी पद्‌धत कृषी महाविद्‌यालय, पुणे आणि सीएस आर एस ( मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र) , पाडेगाव मध्ये २००३-०४ मध्ये विकसित केली गेली.

पद्धत : जैवनियंत्रण एआयसीआरपी (अखिल भारतीय समन्वित  जैविक कीड नियंत्रण प्रकल्प), पुणे केंद्राने छाया जाळीचे तंत्र विकसित केले. ५x५ मीटर आकाराचे क्षेत्र पिंजरे तयार केले आणि जेकी ५०% छाया जाळ्या आणि सहा महिने जुण्या ऊसाच्या पिकावरिल लोकरी माव्याच्या वसाहती बांबू खांबांनी बनलेले आहे. जेव्हा मावा ६०-७० टक्के प्रमाणात झाडांवर वाढतात, त्यांनतर डिफा /मायक्रोमस चा वाढलेल्या आळ्या सोडल्या जातात . शिकारी विकसित होत असलेल्या माव्याच्या संख्येवर वाढतात. सुमारे २५०० शिकारी ६० दिवसाच्या आत एका पिंजऱ्यांतून काढले जातात. सुमारे ४२ आणि २५  छाया जाळ्या एआयसीआरपी, पुणे केंद्र सीएसआरएस (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र) , पाडेगांव ने अनुक्रमे तयार केले आहेत. छाया जाळी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरका‌‌ने शासनाने शेतकऱ्यांना रूपये २०,०००/- इतकी सबसिडी दिलेली आहे.



लोकरी मावा व्यवस्थापनासाठी जैवनियंत्रण धोरण :

१) किटक लवकर शोधण्यासाठी ऊस पिकाचे परिक्षण करा. माव्याचा उद्रेक पॅच मध्ये होतो विशेषत: अंधुक भागात जेथे आद्रता जास्त असते.

२) रासायनिक खतांचा केवळ शिफारस केलेला डोसच लागू करा. नत्रयुक्त खताच्या अत्याधिक वापरामुळे माव्याचा ओक होतो.

३) जर नैसर्गिक शत्रु उपस्थित असतील, तर रसायनिक किटकनाशकांची फवारणी टाळून त्यांचे संरक्षण करा.

४) जर शिकारी दिसले नाहीत, लोकरी माव्याच्या तीव्रतेनुसार दोन ले तीन डिफा (१००० प्रती हेक्टर) किंवा मायक्रोमस (२५०० प्रती हेक्टर) इतके सोडा.


शेतकऱ्यांचा अनुभव :

कोल्हापूरमधील शिवाजी पाटील सांगतात, "मी जैविक उपाययोजना केल्यानंतर ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली. खर्च कमी झाला आणि जमिनीची ताकद टिकली. हा उपाय खरंच क्रांतिकारी आहे."


परिणाम :

३ ते ४ हंगामांमध्ये माव्याचे प्रमाण ७० ते ८० टक्क्याने घटले. रासायनिक कीटकनाशक वापरात लक्षणीय घट. ऊसाचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर १० ते१५ टनांनी वाढले. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढल्याने मातीची गुणवत्ता सुधारली.


निष्कर्ष :

लोकरी माव्याचे जैविक नियंत्रण हे केवळ एक पर्याय नव्हे, तर एक प्रभावी व पर्यावरणपूरक उपाय आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या प्रयोगाचा स्विकार करून जैविक शेतीच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ही एक खरी यशोगाथा आहे जी देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.