फलटण चौफेर दि १७ जून २०२५
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजाळे ता फलटण येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे खास स्वागत करण्यात आले. फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मनोभावे स्वागत केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आमदार सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्व पटवून दिले. "जिल्हा परिषद शाळेत शिकत असलात तरी तुमची स्वप्ने मोठी असली पाहिजेत. मी स्वतः छोट्या शाळेत शिकून आज फलटण तालुक्याचा आमदार झालो आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देखील अशाच छोट्या शाळेतून शिक्षण घेतले आणि आज देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत," असे त्यांनी सांगितले.शाळेच्या पहिल्या दिवशी नव्या वही, नवे पुस्तके, नवीन शिक्षक, नवीन मित्र-मैत्रिणी आणि नवीन वातावरण या सगळ्यांचा आनंद घ्या आणि टेन्शन विसरून मनापासून अभ्यास करा, असे आवाहन आमदारांनी विद्यार्थ्यांना केले. "शिक्षणातून मोठे व्हा, शाळेचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करा," असे प्रेरणादायी संदेश त्यांनी दिले.
तसेच शिक्षकांनाही मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले, "शिक्षक हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे आणि शासन आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे."यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.