फलटण चौफेर दि १२ डिसेंबर २०२५ साखरवाडी ता. फलटण येथे बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळावी या मागणीसाठी साखरवाडीतील भीमसैनिकांच फलटण येथे ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. बुद्ध विहारासाठी जागा देण्याचे लेखी पत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. साखरवाडी, ता. फलटण येथे बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळावी या मागणीसाठी साखरवाडीतील भीमसैनिक तब्बल २५ वर्षांपासून सातत्याने ग्रामपंचायतीकडे मागणी करत आहेत. मात्र योग्य जागा उपलब्ध असूनही बुद्ध विहारासाठी जागा दिली जात नसल्याने भीमसैनिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या असंतोषाचा उद्रेक सोमवारी शेकडो भीमसैनिकांनी फलटण तहसील कार्यालयावर भव्य लाँग मार्च काढून व्यक्त केला. जागा मिळण्याबाबतचे समाजाच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले आहे जागेबाबतचे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.