गुरु माणसाच्या जीवनाला, योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात. ज्याच्या जीवन मार्गावर अंधकार पसरला आहे, त्यांच्यासाठी पणती होऊन प्रकाश देण्याचे काम करतात. गुरूंमुळे संस्काराचा बोध होतो.
आणि ज्ञानाचे भांडार खुले होते, अशा या गुरूंचे आपल्या जीवनातले स्थान अनन्यसाधारण असते.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर बरे वाईट परिणाम घडविण्यात, ज्यांच्यावर सर्वांचा पूर्ण विश्वास आहे, तो घटक म्हणजे शिक्षक. प्राचीन काळापासून शिक्षकांचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात आले आहे, शिक्षकच राष्ट्राचा निर्माता आहे, असे पूर्वीच्या काळी खुद्द राजाला सुनावले होते, राजे आणि सम्राट हे गुरूंचा आदर करीत असल्याचे अनेक दाखले आहेत,
अशाच एका राजाची, शिक्षकांसंबंधी एक कथा....
समाजाच्या साठी सर्वात मोठे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे एकदा एका राजाने ठरवले, शिपाई व नोकरांकरवी तसे संपूर्ण राज्यात कळविण्यात आले, मग असा सन्मान मिळवण्यासाठी राज्यभरातून वैद्य, व्यापारी, आणि सर्व क्षेत्रातील मोठ, मोठ्या व्यक्ती आल्या, आणि त्यांनी आम्ही समाजासाठी कसे योगदान दिले आहे, आणि या सन्मानास कसे पात्र आहोत, हे राजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या सांगण्याने राजा काही प्रभावित झाला नाही, शेवटी एक प्रौढ व्यक्ती आपल्या उजळ चेहऱ्याने राजा पुढे आली आणि म्हणाली... मी एक शिक्षक आहे,
राजा ताबडतोब सिंहासनावरून खाली आला, आणि वाकून त्या शिक्षकाला वंदन केले, याचे कारण समाजाच्या भवितव्यास आकार देण्याचे काम सर्वाधिक शिक्षकच करू शकतो, यावर प्राचीन काळातील राजे महाराजांचा विश्वास होता.
प्राचीन काळी शिक्षकास, आदराने गुरु म्हटले जायचे, गुरु या शब्दाचा अर्थच मुळी थोर मोठा असा आहे
आपल्या जीवन प्रवाहाला गती आणि आपल्या अंधारलेल्या आयुष्यात ज्ञानज्योती उजळवणारा, आपले डोळे उघडवणारा, प्रसंगीत कान पिळणारा थोर पुरुष म्हणजे गुरु
संत कबीर गुरु बद्दल म्हणतात..
सब धरती कागज करू, लेखणी सब बनराय
सात समंद की मसि करू गुरु गुन लिखा न जाय
धरतीचा कागद केला, वृक्षांची लेखणी केली, आणि सात समुद्राची शाई केली तरी, गुरूंचे गुण लिहिण्यास अपुरे पडतील.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक नाते असे असते, त्यांच्यात भावनिक बंध निर्माण झालेले असतात, शिक्षक प्रसंगी आपल्या विद्यार्थ्यांचे आईबाप ही होतात.मी शिक्षक का झालो असे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ सॉक्रेटिस नेहमी म्हणायचे....माझे वडील शिल्पकार होते, ते मूर्ती घडवायचे, आई सुईण होती, ती उमलत्या जीवाला प्रकाशात आणण्याचे काम करायची, आई-वडिलांची ही काम एकत्रितपणे करावी, असे मी ठरवलं आणि मी शिक्षक झालो. खरंच आज अशाच गुरूंची गरज आहे, गावात चांगले विचार रुजविण्यासाठी, अशा गुरूंची आणि त्यांच्या विचाराची, आवश्यकता आहे, शिक्षक बांधवांनी आपले कर्तव्य न विसरता, देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी, विद्यादान करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण जि. सातारा. फो. ९९७०७४९१७७