विडणी(योगेश निकाळजे) - विडणी येथे निरा -उजवा कालव्यावर सुमारे पाच कोटी रुपयांच्या शासनाच्या अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली आहे.
विडणी गावातून निरा उजवा कालवा जातो,या कालव्यावर सुमारे शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी वाहतूकीसाठी पुल बांधला होता मात्र या पुलाची सध्या दुरावस्था व काही ठिकाणी पडझड झाल्याने हा पुल धोकादायक झाला आहे, विडणी गाव हे या कॅनालमूळे दोन भागात विभागलेले असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते हा पुल अरुंद असल्याने याठिकाणी अनेकदा लहानमोठे अपघातही होत असतात तसेच याठिकाणी विद्यानगर येथील शालेय विद्यार्थिनींचा अपघात होऊन तीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली होती.
या पुलाची अवस्था व लोकांना होणाऱ्या समस्यांचा विचार करून विडणी गावचे सरपंच सागर अभंग व त्यांचे मोठे बंधू मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग यांनी याठिकाणी नवीन पुल बांधण्यात यावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले होते व यामुळेच नुकताच शासनाच्या अंदाजपत्रकात माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून विडणी येथील हा नवीन पुलाचे बांधकामासाठी मंजूरी देण्यात आली असून या नवीन पुलासाठी सुमारे ५ कोटी रुपये मंजूर केले आहे ( शासन निर्णय क्रमांक - पीएलएन - २०२३/ सी.आर.४५०/नि-३ दि. ९ फेब्रुवारी २०२३ )सध्या या पुलाच्या कामास सुरवात करण्यात आली असल्याने या पूलाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याने समस्त विडणी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

