फलटण चौफेर दि १३: शिरवळ पोलीसांनी एका धाडसी कारवाईत तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अशपाक आव्वास खान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच चोरी केलेला ४ लाख ५१ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या ५-६ महिन्यांपासून शिरवळ, नायगाव, धनगरवाडी, केसुर्डी आणि भोळी या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत जनित्रांमधून तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली.
गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, तपासात असे दिसून आले की चोरीची घटना ही पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय टोळी आणि भोर तालुक्यातील स्थानिक चोरट्यांनी मिळून केली होती. या माहितीच्या आधारे, शिरवळ पोलीसांनी अशपाक खान याला सापळा रचून ताब्यात घेतले.
खान याने चौकशीदरम्यान इतर तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या आधारावर शिरवळ पोलीस ठाण्यात नोंदवलेले सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
जप्त केलेल्या मुद्दामालात एक कार, चोरी केलेले तांब्याचे तार आणि इतर साहित्य समाविष्ट आहे.

