फलटण चौफेर दि २९महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांचा पुर्णाकृती संयुक्त पुतळा फलटण नगरपालिका हद्दीमध्ये पुणे पंढरपुर रोडवर जिंती नाका येथे आहे. या पुतळ्या भोवती असणारे कंपाऊंड पडले आहे. तसेच चबुतऱ्याची पडझड झाली असलेने या परिसराची अतिशय दयनिय अशी दुरावस्था झाली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांचा देशातील हा एकमेव संयुक्त पुतळा असले कारणाने या स्मृतीस्थळाचे सुशोभिकरण करण्यासाठी अनेकदा प्रशासनास दुरुस्तीसाठी पत्र व्यवहार करण्यात आलेला होता. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. शनिवार दि १ जून रोजी सौ. वेणूताई चव्हाण यांचा स्मृतिदिन असल्याने सदर ठिकाणी अभिवादन करण्यासाठी फलटण तालुक्यातील बहुसंख्य लोक उपस्थित राहत असल्याने सदर परिसराची स्वच्छता सत्वर करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण शहराध्यक्ष पंकज पवार यांनी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे