रात्री चे १२ वाजले आहेत, पण सायंकाळ पासून फलटण येथील सुभाषराव शिंदे भाऊंचा चेहरा काही डोळ्या समोरुन जाता जाईना. या फाटक्या तोंडाच्या पण निर्मळ मनाच्या माणसाने माझ्या सारख्याच्या ही काळजात घर केले होते. उभी हयात शरद पवार यांच्या भक्तीत तल्लीन झालेले भाऊ आज अचानक सोडून गेले हे मनाला पटत नाही.
यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे आणि शरद पवार सांगतील ते धोरण व बांधतील ते तोरण अशी कृती करणारे भाऊ हे पवारांच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेले अजब रसायन होते. गेल्या २०-२२ वर्षात अनेकदा त्यांना भेटलो.
मध्यंतरी फलटण येथे झालेल्या विभागीय साहित्य संमेलनातील परिसंवादाला मला निमंत्रित करण्यात आले होते. संमेलन स्थळाहून निघताना सुभाषराव शिंदे यांचा फोन आला. हरिष राव फलटण ला आलाय समजल, आमचा काय राजवाडा नाही, आमच्या कडे कशाला याल ?? तुम्ही दोन्ही निंबाळकरांच्या जवळचे, त्यातल्या त्यात रामराजे यांच्या जास्त जवळचे. जा जा नका येऊ...!! निमंत्रण देण्याची भाऊंची ही अजब पद्धत.
मला ही भाऊंचा हा आक्षेप खोडून काढायचा होताच. ती संधी त्यांच्याच फोन ने दिली. मी म्हणालो मी आज तुम्हाला न सांगता तुमच्याकडे येणार होतो आणि तुम्ही जा जा काय म्हणताय ?? आलोच.
पण त्यांना विश्वासच बसेना. माझ्या सोबत असलेल्या सहकारी मित्रांना ते खात्री करण्यासाठी सारखे फोन करु लागले, पण पुढच्याच काही मिनिटात जीवनधरजी चव्हाण आणि मी जिद्दी भाऊंच्या जिद्द बंगल्यात पोहोचलो, सोबत फलटणची पलटण होतीच. मला गेटवर पाहताच काय हरकले सुभाषराव भाऊ, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत होती, काय करु आणि काय नको अशा त्यांच्या हालचाली होत्या. त्यांना विश्वास बसत नव्हता मी त्यांच्या घरात आहे.
भाऊंची ती तारांबळ मी एन्जॉय करत होतो. मला ते टोमणे मारायचे त्यात विखार नव्हता तर ग्रामीण भागातून जाऊन पत्रकारितेच्या वरच्या पदावर काम करत असलेल्या आपल्या भागातील मुलाबद्दलचा वेगळा स्नेहभाव त्यांच्या मनात होता, त्याचे प्रत्यंतर त्या भेटीत मला जाणवत होते.
यशवंतराव चव्हाण साहेब, किसन वीर आबा, शरद पवार साहेब यांच्या जुन्या आठवणींचा खजिनाच ते रीता करत होते. माझ्या सारख्या अभ्यासकाला तसे ते सकस खाद्य च होते, जुने संदर्भ गोळा करुन घेऊन जाणे, ते तपासणे आणि समकालीन राजकीय परिस्थिती का निर्माण झाली याचा अभ्यास करणे ही माझी तशी जुनी खोड.
भाऊंची भेट माझ्या त्या खोडीला आणखी एक खोडकर भेटल्या सारखीच होती. कधी दारा शेजारच्या खुर्चीवर, कधी मधेच सोफ्यावर तर कधी अचानक मधेच उभे राहुन खट्याळ, परखड गावरान बाजात बोलणाऱ्या सुभाषरावांची अस्वस्थता ही लपून रहात नव्हती.
गप्पा गोष्टी सांगता सांगता ते सारखे कुणाला तरी फोन लावत होते, आर आण की मर्दा लवकर ! म्हणत दरडावत होते. मला समजेना भाऊ आता कुणाला आणि कशाला बोलवत आहेत??? मी म्हटलं आता जाऊ द्या, तुमचा आक्षेप खोटा ठरवला आहे मी, तुम्ही हरला आहात.
माझे ऐकतील ते भाऊ कसले ते म्हणाले आता या पुढे तुम्हाला टोमणे मारणार नाही पण फेटा बांधावा लागेल!
अच्छा ! म्हणजे मघापासून जी चलबिचल सुरु होती ती फेटेवाला लवकर येईना म्हणून होती तर ! हे आता माझ्या लक्षात आले, तोवर जो फेटा शरद पवार साहेबांना भाऊंनी बांधला होता तसाच फेटा बांधायला फेटेवाला सज्ज.
आता मात्र मी वरमलो होतो, भाऊंनी केलेल्या आदरातिथ्याने भारावलो होतो. ५० वर्षे शरद पवार साहेबांना सोबत करणारे सुभाषराव मी त्यांना राजकीय दृष्ट्या फारशी मदत न करता ही एवढा सन्मान देतात ही भावनाच सुखावणारी होती, त्या भेटीत अगत्य होते, आपलेपणा होता, रंग पंचमीच्या रंगात मिसळून जावे अशी ती भेट न ठरवता झाली, तिच्यात कुणा विषयी द्वेषभावना नव्हती.
हरिष राव शेतकऱ्याना न्याय देताय म्हणून हा फेटा आहे आणि बघा तुम्हाला तो कसा मर्दा सारखा शोभतोय असे म्हणत भाऊ खळखळून हसू लागले.
बंगल्याला त्यांनी जिद्द नाव का दिलं असावं याचे कोडे त्यांच्या घरी दिलेल्या त्या भेटीत उलगडले. निरोप देताना त्यांना गलबलून आले!
त्यांच्या जिद्दीनेच मला त्यांच्याकडे खेचून नेले होते.
शरद पवार यांचा सातारा दौरा असला की नीरेच्या पुलावर भला मोठा गुलाबाचा हार सुभाषरावांचाच. स्वागत कुठे ही असो पहिला हार यांचाच, शास्त्रच होते जणू ते! शरद पवार यांना ही डाव्या उजव्या बाजूला सुभाषराव दिसले नाहीत की चैन पडायच नाही.
सायेब माझा देव आहे, तो आहे तोवर भेत नसतो हा फाकड्या हे भाऊंचे परवलीचे वाक्य.
बाळासाहेब पाटील मंत्री झाले तेंव्हा वाईत आमदार मकरंद पाटील यांनी त्यांचा सत्कार ठेवला होता. त्या कार्यक्रमाला शरद पवार येणार होते. येताना त्यांनी सुभाषरावना हेलिकॉप्टर मधून आणले होते. व्यासपीठावरुन भाऊ मला खुणावत होते. हार पवार साहेबांच्या गळ्यात होता पण गुलाब भाऊंच्या गोऱ्या पान गालावर फुटत होते. मी त्यांना फोन लावला, काय स्वारी आज जाम खुश दिसतेय! तसा गडी जाम लाजला. हरिशराव, सायबानी हेलिकॉप्टर मधून आणले, १२ त माझा नंबर असणार, आता सोडत नसतो तुमच्या राजाला ह्याह्याह्या..!!
दुसऱ्या दिवशी मी पुढारीत मजेशीर बातमी छापली, पवारांनी आजवर काही नाही दिले तरी निदान हेलिकॉप्टर मधून शेजारी बसवून आणले, सुभाषरावांच्या निष्ठेचे सोने झाले. दुसऱ्या दिवशी सुभाषराव थेट मला भेटायलाच पुढारीत! जाम खुश, काय लिहिलय मर्दा, आजवर कुणी माझ्यावर एवढे लिहिले नाही, आता कोणताच आक्षेप राहिला नाही असे म्हणून पुढचे दोन तास सगळे जुने संदर्भ भाऊंनी सांगितले.
१९९० च्या निवडणुकीत चिमणराव कदम यांच्या विरोधात अपक्ष लढताना त्यांनी घोडा हे चिन्ह घेतले होते. १९९५ ला रामराजे राजकारणात आले आणि आमचेच चिन्ह त्यांनी आम्हाला लावले हे वाक्य किती तरी वेळा मी त्यांच्या तोंडातून ऐकावे आणि हसता हसता पुरेवाट व्हावी. अलीकडे ते सतत माझ्याशी बोलायचे. कधी कधी मला जुने संदर्भ हवे असतील तर मी त्यांना फोन लावायचो तेंव्हा त्या संदर्भाच्या आधीची दहा वर्षे आणि पुन्हा नंतरची दहा वर्षे सगळे धमाल किस्से ते सांगायचे. त्यात इरसाल शिव्या, संताप, आलेले वाईट अनुभव साऱ्यांचे मिश्रण असायचे. त्यांची एकच इच्छा होती त्यांना आमदार व्हायचे होते. या खेपेला साहेब मला आमदार करणार आहे आणि नाही केले तर प्रीती संगमावर जाऊन मी चव्हाण साहेबांच्या समाधीवर टकरा घेणार असे भाऊ मला बोलून गेले होते. रामराजेना जेंव्हा पुन्हा विधान परिषदेवर घेतले तेंव्हा आला ना मला भाऊंचा फोन, आयला हरिशराव फसिवल आपल्याला परत, मी जातोय आज समाधीवर !! त्या दिवशी तीन वेळा मी फोन वर त्यांच्याशी बोललो. राजकारणातल्या मर्यादा सांगितल्या पण ऐकणार ते भाऊ कसले??
आमदार होऊनच दाखवतो
जिद्द आहे ह्या सुभाष शिंदेची, बघाच तुम्ही, पुस्तक लिहायला घ्या, मी काय काय केले आहे ते, त्यावर घोड्याचे चित्र लावा ...असा तोंडाचा पट्टा सुरु.
पण आज ते पुस्तक अपूर्णच राहिले. जुन्या राजकीय पिढीचा इतिहास सांगणाऱ्या या संदर्भ ग्रंथाची पानेच निखळली. घोडा उधळून गेला, त्याचे चित्र कुठे लावू?? समोर खुंटीवर भाऊंनी जिद्द बंगल्यात स्वतःच्या हाताने माझे औक्षण करुन बांधलेला भरजरी फेटा ही आज गहिवरला आहे.
भाऊ' जिद्द 'का सोडली हो??
हरिश पाटणे, सातारा.