विडणी -(योगेश निकाळजे ) - माढ्याचे खासदार हे आमदार जयकुमार गोरे यांचे पीए असून आमदार पुढे व खासदार पाठीमागे बसत असल्याचे चित्र हे एक देशातील एकमेव उदाहरण असल्याचा टोला रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला.
अयोध्या नगरीत श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त विडणी ता.फलटण येथे प्रभू श्रीराम भव्य मिरवणूक सोहळा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर बोलत होते, कार्यक्रमास आमदार दिपकराव चव्हाण,श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर,श्रीमंत सत्यजितराजे नाईक - निंबाळकर,श्रीमंत विश्वजीतराजे नाईक- निंबाळकर, श्रीराम साखर कारखानाचे चेअरमन डॉॅ. बाळासाहेब शेंडे,ज्येष्ठ नेते माधवराव अभंग,सर्जेराव नाळे,तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण नाळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून व बोराटवाडीतून फलटणमध्ये येऊन तालुक्याचे व जिल्ह्याचे वाटोळे करायला निघालेल्या प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे असेही प्रखड मत आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी श्रीमंत रामराजे यांनी यावेळी मांडले,सध्या फलटण तालुक्यात दादागिरी सुरु झाली असून कार्यकर्त्यांना धमकावणे मारण्याची भाषा वापरली जात असून आता यापुढे आपणही टोल्याला टोला द्यावाच लागणार असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली मैत्री असून आपला भाजप पक्षाला विरोध नसल्याचेही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी सांगितले, फलटण तालुक्याचे पुढील भविष्य कोणाच्या हातात द्यायचे हा विचार सर्वांना करावा लागणार असून येत्या खासदारकीच्या निवडणूकीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे योग्य माणूस असल्याचेही श्रीमंत रामराजे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
फलटण तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून शांतता राखण्याचे प्रयत्न श्रीमंत रामराजे हे करत आहेत मात्र सध्या विरोधक काठ्यांना तेल लावून ठेवल्याची भाषा करत आहेत मात्र त्या काठ्या बाहेर काढण्याची ताकद त्यांच्यात नाही, आपल्याकडेही बाभळीच्या काठ्या आहेत मात्र आपल्याला लोकशाही मार्गाने या प्रवृत्तींना थांबवण्याचे काम करावे लागणार असल्याचे मत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
विडणी गावातील अनेक विकासकामे ही राष्ट्रवादी च्या माध्यमातून झाली आहेत व ती अजूनही चालूच आहेत त्याचे जीआरही आपल्याकडे आहेत मात्र विरोधक ही कामे आपणच केली आहेत असे खोटे सांगून त्याचे श्रेय घेत आहेत मात्र नागरिकांनी याची खात्री करावी या विषयीचे आपल्याकडे सर्व कागदपत्रे असल्याचे यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक- निंबाळकर उपसरपंच सुनिल अब्दागिरे, दत्तात्रय अब्दागिरे,डॉ.उत्तमराव शेंडे,डॉ.रवि शेंडे,शुभम गायकवाड इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली,किशोर ननावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची रथातून हलगी, डिजे व टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते .