साखरवाडी(गणेश पवार)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थिंक महाराष्ट्र डॉट कॉम व इतर चार संस्थांनी दि 15 ऑगस्ट ते 30 जानेवारी दरम्यान व्याख्यानमाला सत्राचे आयोजन केले आहे याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,वैचारिक घुसळण म्हणता येईल अशी एक वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू करत आहोत पंच्याहत्तर व्याख्याते तेवढ्याच व्याख्यानांतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद दि 15 ऑगस्ट 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये साधतील असा हा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध विषयांवरील अभ्यासू व्यक्तींनी व्याख्याने देण्यासाठी स्वेच्छेने पुढे यावे आणि महाविद्यालये व अन्य तरुण व्यासपीठे यांनी तशा व्याख्यानांचे संयोजन करण्यास सिद्ध व्हावे अशी विनंती आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचे ‘सद्भाणवनेचे व्यासपीठ’ (मुंबई), सामाजिक संस्था ‘स्वप्नभूमी’ (केरवाडी-परभणी), ‘विचारवेध’ (पुणे), ग्रंथालय मित्र मंडळ (ठाणे) आणि आरोग्य भान (पुणे) या पाच संस्थांच्या तर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
प्रगत तंत्रज्ञान, समाजमाध्यमांनी घडवलेली नवी जीवनशैली आणि कोरोना काळापासून बिघडलेली मानवी आयुष्याची एकूण घडी यांबाबत विचारमंथन व त्याद्वारा समाजजागृती हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाढलेले शिक्षण आणि पदव्या यांमुळे पैसे मिळवण्याची क्षमता बरीच आली आहे; पैसाही समाजात खुळखुळत आहे. मात्र वास्तव मनुष्य जीवनात सारी मूल्यव्यवस्थाच कसोटीला लागली आहे. जीवनशैली पर्यावरणानुकूल असावी ही जाणीव बऱ्यापैकी प्रसृत आहे. परंतु जीवनशैली प्रत्यक्षात कशी असावी आणि ती कशी अवतरेल याबद्दल चर्चेत नेमकेपणा आढळत नाही. त्यामुळे एकूण मानवी आयुष्यात, वर्तनात भरकटलेपणा आला आहे- विकृती वाढत आहेत.
उपक्रमात विविध विषयांतील तज्ज्ञ व्याख्याते विद्यार्थ्यांशी/तरुणांशी संवाद साधतील. नमुन्यासाठी म्हणून सध्या पुढील विषयक्षेत्रे नमूद करत आहोत. वक्ते पुढे काय तर्जुमा घेऊन येतात त्यावर बरेच अवलंबून आहे. विशेषत: अनुभवी, निवृत्त मंडळींनी व्याख्याने देण्यास पुढे यावे असे आग्रहाने सुचवत आहोत. स्फूर्तिदायक विषय, तरुणांपुढे असलेली आव्हाने, कायद्यांचे ज्ञान, तर्कशुद्ध विचार करण्याची सवय, जीवनकौशल्ये, पैसे मिळवण्याचे विधायक मार्ग- त्यासाठी असलेल्या संधी, तरुणांतील बलस्थाने शोधण्यास त्यांना मदत, पर्यावरणाची जबाबदारी, कलेचे स्थान आणि तिचे महत्त्व, सांस्कृतिक प्रभावाचे वातावरण, तरुणांमधील व्यसनाधीनता, ताणाचे नियोजन, वृद्धत्वकाळाची कसोटी, लग्न-नातेसंबंध... या आणि अशा अन्य सद्यकाळातील आव्हानात्मक विषयांतून वैचारिक घुसळणीसाठी चालना मिळू शकेल.
महाविद्यालयांना विनंती अशी, की त्यांनी त्यांच्या महाविद्यालयांत ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 या सहा महिन्यांत स्वतंत्र भारताची पंच्याहत्तर वर्षे साजरी अमृतमहोत्सवी व्याख्याने योजून करावी. महाविद्यालयांची जबाबदारी अशी, की त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यानांसाठी दीड तास मोकळे ठेवावे. संयोजक पाच संस्था व्याख्यानमालेचा उपक्रम स्वयंप्रेरणा आणि सामाजिक जबाबदारी या भावनेतून आणि स्वखर्चाने करत आहेत. तरीसुद्धा महाविद्यालयांनी व समाजातील मान्यवर व्यक्तींनी त्यांना शक्य होईल तसा खर्चातील वाटा उचलावा- त्यांच्यापैकी कोणी व्याख्यात्यांची त्यांच्या गावातील निवासव्यवस्था, भोजन असे आतिथ्य सांभाळावे.
वक्ते म्हणून अनुभवी, कुशल व तज्ज्ञ व्यक्ती, विशेषतः सक्षम ज्येष्ठ नागरिक हे या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांच्याकडे असलेले ज्ञान, वेळ आणि पैसे यांची या उपक्रमाला गरज आहे. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील सुशिक्षित लोक असेच संघटित झाले व प्रत्यक्ष कार्यात उतरले. सध्याच्या अनिश्चित काळातील हतबलता हटावी आणि वैचारिक घुसळण सुरू व्हावी अशी व्यापक अपेक्षा या व्याख्यानमालेच्या संयोजनामागे आहे. स्वयंस्फूर्तीने आपणास जे देणे शक्य आहे, त्याचे मनापासून स्वागत आहे. यामुळे या चळवळीला पाठिंबा मिळेल. आपण तो द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती समन्वयक
अपर्णा महाजन 98220 59678
सुनिल जोशी 93226 42360 इमेल ssjoshiassociates@gmail.com
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम- सद्भावनेचे व्यासवपीठ (मुंबई) सामाजिक संस्था - स्वप्नभूमी (केरवाडी-परभणी), विचारवेध (पुणे), ग्रंथालय मित्र मंडळ (ठाणे), आरोग्य भान (पुणे) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.