साखरवाडी गणेश पवार
सहकारी आणि खासगी दूध संघांमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाईच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपये दर देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. येत्या २१ जुलै पासून सुधारीत दर
देणे दूध संघांना बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे तसेच हा दर विनाकपात दूध उत्पादकांना देणे बंधनकारक आहे. अंमलबजावणी होते की नाही, याबाबतचा दूध दराची अहवाल जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दूध दरासाठी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने ३.५/८.५ या गुणप्रतिच्या दुधास ३४ रुपये दर निश्चित करण्याची केलेली शिफारस राज्य सरकारने मान्य केली आहे
दरम्यान, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन या समितीने दर तीन महिन्यांनी किमान दूध खरेदी दराची शिफारस राज्य सरकारला करावयाची आहे. परंतु, विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास तीन महिन्यांपूर्वीही समितीने दूध दराबाबत शासनाला शिफारस करणे गरजेचे आहे, असेही आदेशात म्हटले आहे.