फलटण चौफेर
दहिवडी, दि. ५ जुलै: दादर (मुंबई) येथील वयोवृद्धाला नकली सोन्याचे बिस्किट देऊन लाखोचा गंडा घालणाऱ्या गुन्हेगारांना माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथून दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि. अक्षय सोनवणे यांच्या मदतीने दादर पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई दादर येथील वयोवृद्ध इसम गोविंद विनायक अग्निहोत्री वय ७४ रा. दादर ( मुंबई ) हे ब्राह्मण सेवा मंडळाच्या बाजूला असणाऱ्या पोळी भाजी केंद्रामधून पोळी भाजी आणण्याकरता गेले असता. परत येताना ब्राह्मण सेवा मंडळाच्या बाजूला उभे असणाऱ्या विठ्ठल ग्यानबा जाधव वय २७ वर्ष, बाळासाहेब युवराज गायकवाड वय २४ वर्ष, धोंडीराम केरबा गायकवाड वय ३४ वर्ष तिघेही रा. सलगर ता. जि. लातूर यांनी सदर इसमाला सांगितले की तुमच्याकडील सोने आम्हाला द्या आम्ही तुम्हाला सोन्याचे बिस्किट देतो. सदर इसमाला खात्री वाटावी म्हणून तिघांपैकी एकाने जवळील सोन्याची चैन आणि अंगठी मित्राला दिली आणि त्याने त्याला सोन्याची बिस्किट दिले. वयोवृद्ध इस्माला खात्री पटल्यामुळे त्याने देखील आपल्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची चैन आणि पाच ग्रॅम सोन्याची अंगठी दिली. आणि आरोपीने त्यांना सोन्याचे बिस्किट दिले. सोन्याचे बिस्किट घेऊन सदर इसम ज्वेलर्स मध्ये गेले असता. बनावट सोन्याचे बिस्किट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गोविंद अग्निहोत्री यांनी दादर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीवरून दादर पोलिसांनी बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला असता. सीसी टीव्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न करून त्यांच्या मूळ गावी जाऊन तपास केला असता. आरोपी शिखर शिंगणापूर ता. माण जि. सातारा या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकासह जाऊन दहिवडी पोलिसांच्या मदतीने सदर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जर अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर तात्काळ दादर पोलिसांशी संपर्क करावा कारण सदर आरोपीकडून अनेक जणांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरची कारवाई दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्त प्रमुख हवालदार सौ. व्ही. एल. दडस व होमगार्ड, पोलीस पाटील शिंगणापूर, यांच्या मदतीने दादर पोलीस पथक सपोनि भगवान पायघन, हवालदार मनीष मोरे, दया शिंदे, मनोज सुतार, सागर निकम, पो कॉ. दिनेश विषे, मच्छिंद्र पाटील यांनी केली आहे.