तरडगाव(नवनाथ गोवेकर)तरडगाव ता. फलटण परिसरात गेल्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यामुळे पंखे, कुलर यांचा वापर वाढू लागला आहे मात्र सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना उकाड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे पंखे व कुलर बंद पडल्याने नागरिक हैराण झाले होते. तसेच सततच्या विजेच्या अस्थिरतेमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये बिघाड होत असल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
वाढत्या तापमानाने जनजीवन चांगलेच होरपळून गेले आहे. उन्हाची तीव्रता, वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून उन्हाची बाधा झाल्याने डायरिया, जुलाब, उलट्या, ताप या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तीव्र प्रमाणात ऊन लागल्यास उष्माघात तसेच बीपी-शुगरच्या रुग्णांमध्ये स्ट्रोक बसण्याचीही शक्यता असल्याने उन्हापासून बचावासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तरडगाव हे मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. नेहमीच गजबजलेली बाजारपेठ देखील उन्हाच्या धास्तीने नागरिकांनी पाठ फिरवल्याने ओस पडल्या असून शुकशुकाट जाणवत आहे.