साखरवाडी(गणेश पवार)
कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीत २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी केले आहे. बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी यानुसार अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनुदान देण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत २० एप्रिल २०२३ पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सकाळी ९.३० ते ४.३० पर्यंत प्रस्ताव व अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, फलटण सुनिल धायगुडे व सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे. -
शेतकऱ्यांनी अर्ज, कांदा विक्रीची मूळ पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड स्वतः प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत, बँकेतील बचत खात्याचे पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आदी कागदपत्रे जमा करावीत. सातबारा उताऱ्यावर वडीलांचे नावे, विक्री पट्टी मुलाच्या वा अन्य कुटुबांचे नाव आहे अशा प्रकरणात वडील, मुलगा व अन्य कुटुंबीयांनी सहमतीपत्र अथवा शपथपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सातबारा उतारा ज्याच्या नावे असेल त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज बाजार समितीमध्ये विनामुल्य उपलब्ध आहेत.