साखरवाडी(गणेश पवार)
आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशी असते. या वारीला भागवत धर्म आणि वारकऱ्यांकडून विशेष महत्त्व असतं. ही मोठी वारी असल्याने आषाढी वारीला पंढरपुरात मोठा सोहळा आणि राज्यभर याचा जल्लोष असतो. संतांच्या पालख्या पंधरा ते वीस दिवस अगोदरच विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट घेतात.
राज्यातील अशा अनेक पालख्या विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट घेतात. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही मानाच्या पालख्यांपैकी एक असते. आळंदी ते पंढरपूर असा या पालखीचा प्रवास असतो. तर यामध्ये विविध ठिकाणी मुक्काम, रिंगणा सोहळा, वारकरी, पंगती अशा थाटात माऊलींची पालखी पंढपूरात दाखल होत असते.
यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीचे 11 जून रोजी आळंदीहून पंढरपुरकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे.
रविवार दि. 11 जून रोजी प्रथा-परंपरेनुसार सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास माऊलींच्या पालखीचे वाजत-गाजत प्रस्थान होणार आहे. दर्शनबारी मंडपामध्ये (आजोळी) माऊलींचा पहिला मुक्काम असणार आहे. दि. 12 व दि. 13 जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी राहणार आहे. दि. 14 व दि. 15 सासवड, दि. 16 रोजी जेजुरी, 17 वाल्हे, 18 जूनला नीरा स्नाननंतर 19 जूनपर्यंत पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल. दि. 20 तरडगाव, 21 ला फलटण, 22 बरड, 23 नातेपुते, 24 माळशिरस, 25 वेळापूर, 26 ला भंडीशेगाव, 27 वाखरी तर दि. 28 जून रोजी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपुरला मुक्कामी पोहोचेल. पंढरीमध्ये आषाढी एकादशीचा महासोहळा दि. 29 जून रोजी संपन्न होईल. दरम्यान, पालखी सोहळयात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व पादुकाजवळ उभे रिंगण तर पुरंदवडे, खुडूस फाटा, ठाकुरबुवाची समाधी आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंग होईल.
दि. 3 जुलै पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल. गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघेल.परतीचा प्रवास दि. 3 जुलै वाखरी, 4 वेळापूर, 5 नातेपुते, दि. 6 जुलै रोजी फलटण, दि. 7 जुलै रोजी पाडेगाव, 8 वाल्हे, 9 सासवड, दि. 10 जुलै रोजी हडपसर, 11 जुलै रोजी पुणे, दि. 12 जुलै रोजी आळंदी आणि दि. 13 जुलैला आळंदीत नगरप्रदक्षिणा पूर्ण करून माऊलींच्या पादुका मंदिरात विसावतील श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्याकडून हे आषाढी वारी 2023 चं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.