सुरवडीच्या 'न्यू फलटण शुगर वर्क्स डिस्टलरीने'' दूषित पाणी सोडले रस्त्यावर...*
ग्रामस्थांनी दिले तहसीलदारांना निवेदन कारवाई न झाल्यास कंपनीला टाळा ठोकण्याचा इशारा..
साखरवाडी (गणेश पवार): सुरवडी ता फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स डिस्टलरी कंपनीचे दूषित मळीयुक्त पाणी कंपनीने कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना नांदल, मिरगाव, ढवळेवाडी, निंभोरे परिसरातील गावांना जाणाऱ्या रस्त्यावर सोडून दिले असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याबाबतचे निवेदन सदर गावातील ग्रामस्थांनी फलटणचे तहसिलदार यांना दिले असून डिस्टलरी वर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ कंपनीला टाळा लावणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदल-फलटण रस्त्यानजीक आमची घरे, शेतजमीनी असून आम्हाला दररोजच या मार्गाने ये-जा करावी आमची मुलं बाळ याच रस्त्याने ये जा करीत असतात याच रस्त्यावर डिस्टलरी चे टँकर राजरोसपणे नांदल रस्त्यावर विना परवानगी मळीचे दुषित पाणी सोडत असून याबाबतीत डिस्टलरी कंपनीने कोणाचीही परवानगी घेतली नाही. मळीचे पाणी रस्त्यावर सोडल्याने या पाण्याची दुर्गंधीचा त्रास आजूबाजूस राहत असलेल्या ग्रामस्थांना होत आहे. या दुर्गंधीमुळे लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून लोकांनी वारंवार डिस्टलरी कंपनीस मळीचे पाणी टाकू नये अशी विनंती करूनही कंपनी कोणत्याही शेतकऱ्यास व ग्रामस्थांस दाद देत नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून
मळीच्या दुर्गंधीमुळे येथे राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर शेतमजुर कामाला येत नसल्याने संबंधीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. कित्येक स्थानिकांनी व शेतकऱ्यांनी संबंधीत डिस्टलरी अधिकारी,संचालक तसेच वाहन चालकांना सुचना करूनही संबंधीतांनी संपुर्ण रस्त्यावर मळीचे दुषीत पाणी सोडले आहे.रस्त्यावर सोडलेले मळीचे पाणी हे विहरीत जात असुन त्यामुळे विहीरींचे पाणी दुषीत झाले असल्यामुळे हे पाणी पाण्यायोग्य व शेतीसाठी योग्य न राहिल्याने स्थानिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार कि.मी पायपीट करावी लागत आहे. तरी संबंधीत डिस्टलरी कंपनीवर विना परवानगी रस्त्यावर दुषीत पाणी सोडल्यामुळे फलटण तहसिलदार यांनी संपुर्ण परिसराची पाहणी करून येत्या आठ दिवसाच्या आत सदर कंपनीवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथ न्यु फलटण शुगर वर्क्स डिस्टलरी डिव्हिजन कंपनीस ग्रामस्थ व शेतकरी, शेतमजुर यांच्यावतीने सदर कंपनीस टाळे लावण्यात येईल. अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर नांदल, मिरगाव, ढवळेवाडी, निंभोरे येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डिस्टलरीकडून होणाऱ्या प्रदूषणाकडे अनेक वर्षांपासून आर्थिक हितसंबंध असल्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून कारवाई न झाल्यास सातारा येथील प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यालयावर मोर्चे काढणार असल्याने ग्रामस्थांनी सांगितले आहे.
न्यू फलटण डिस्टलरी कंपनीमुळे 3 ते 4 किलोमीटर परिसरात प्रचंड दुर्गंधी कायम येत असते त्यामुळे प्रदूषण महामंडळाचे अधिकारी प्रत्येक महिन्याला कंपनीत भेट देऊन कंपनीच्या प्रदूषणाबाबतचा अहवाल पाठवतात का? हा सुद्धा संशोधनाचा विषय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे